पुणे आणि नागपूर दरम्यान देशातील अत्याधुनिक आणि वेगवान अशी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस १० ऑगस्टपासून धावणार आहे. या नव्या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा मिळाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे भुसावळ स्टेशनवरील समारंभात उपस्थित राहणार आहेत.
भुसावळ-जळगाव परिसरातील प्रवाशांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर ‘वंदे भारत’ सुरू करण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून, ही जलदगती सेवा सुरु होणार आहे
ही गाडी पुणे-नागपूर (अजनी) हे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण करणार आहे. सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वात वेगवान गाडी असून, तीच अंतर पूर्ण करण्यासाठी १२ तास ५५ मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत या तुलनेत एक तास कमी वेळात नागपूरला पोहोचणार आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे: पुणे ते नागपूर (26101)पुणे प्रस्थान: सकाळी ६:२५. जळगाव आगमन: १२:३५. भुसावळ आगमन: १:०५. नागपूर (अजनी) आगमन: संध्याकाळी ६:२५
नागपूर ते पुणे (26102)नागपूर (अजनी) प्रस्थान: सकाळी ९:५०. भुसावळ आगमन: २:५५. जळगाव आगमन: ३:२६. पुणे आगमन: रात्री ९:५०
या गाडीला दौड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबा असणार आहे.
या नव्या वंदे भारत सेवेमुळे नागपूर-पुणे प्रवास अधिक आरामदायक, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या सेवेमुळे व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

Leave a Reply