डोनाल्ड ट्रम्पच्या हट्टावर पडदा, नोबेल गेले मारिया मचाडो यांच्याकडे

शांततेचे नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना मिळालं, या बातमीपेक्षाही ते डोनाल्ड ट्रम्प यांना नाही मिळालं, याची चर्चा अधिक आहे.

नोबेल समितीने स्वतःची लाज राखली. शांततेचे नोबेल डोनाल्ड ट्रम्प यांना दिले गेले असते, तर नोबेलवरचा उरलासुरला विश्वासही उडून गेला असता. ट्रम्प यांच्यापेक्षा या मारिया बर्‍याच म्हणायच्या.

बराक ओबामांना शांततेचे नोबेल मिळाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच नोबेल मिळाले, तेव्हा नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारताना ओबामा म्हणाले होते, “नोबेल मिळण्याइतकं फार काही काम मी करू शकलो आहे, असं मला वाटत नाही. पण यापुढे मात्र शांततेसाठी मी प्रयत्न करावे, यासाठी हा पुरस्कार दिला असावा.” तेव्हा गमतीने एक पत्रकार त्यांना म्हणाला होता, “अमेरिकेचे अध्यक्ष शांततेच्या रस्त्याने निघाले, तरी जगातली निम्मी युद्धं आपोआप संपतील.”

मुळात, अमेरिकेच्या अध्यक्षाला शांततेचे नोबेल देणे अयोग्यच. अगदी ते ओबामा असले तरी. अर्थात, आहे त्या चौकटीत ओबामांनी शांतता आणि सलोखा या दिशेने काम केले हे निश्चित. ओबामा ही जगाची आशा होती. धाकट्या जॉर्ज बुश यांच्यानंतर ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बुश साहेबांनी जगाचे रूपांतर युद्धभूमीत करून टाकले होते. अशावेळी अवघ्या जगाचे प्राक्तन समान आहे, अशी भूमिका घेणारा कवी मनाचा एक काळासावळा तरुण व्हाइट हाऊसमध्ये आला. तेव्हा तर ती क्रांतीच होती. ओबामांना नोबेल मिळाले, म्हणून मलाही मिळायला हवे, असा हट्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. त्यासाठी, काहीही संबंध नसलेल्या ठिकाणीही, आपण युद्ध थांबवले, असा दावा ते करत होते.

ज्या मारिया बाईंना नोबेल मिळाले आहे, त्या आहेत व्हेनेझुएलाच्या. ट्रम्प यांना हा आणखी त्रास. कारण, अमेरिकेच्या अगदी शेजारी व्हेनेझुएला आहे. मारिया हार्वर्डमध्येच शिकल्या आहेत. लॅटिन अमेरिकेच्या राजकारणातले हे एक महत्त्वाचे नाव. ह्युगो चावेझ नावाचा तगडा नेता दीर्घकाळ इथे अध्यक्ष होता. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना चावेझ यांनी वठणीवर आणले. अमेरिका जगभर धुमाकूळ घालत असताना, या शेजारच्या चिमुकल्या देशाकडे मात्र अमेरिकेला बघताही येत नव्हते. चावेझ हे अनेक अर्थाने महत्त्वाचे. मात्र, अनेक डावे पक्ष पुढे हुकूमशाहीकडे वळतात. समाजवाद आणि साम्यवाद हे शब्द कागदावर कितीही गोड वाटले, तरी ज्यातून हुकूमशाही जन्माला येते, अशा समाजवादाचे करायचे काय? ही तुलना नाही. मात्र, तसेच सांगायचे झाले, तर हिटलरच्या पक्षाचे नावही ‘सोशालिस्ट पार्टी’ होते.

चावेझ यांच्यासमोर बोलण्याची हिम्मत कोणाचीही नव्हती, त्यावेळी एक तरुण मुलगी थेटपणे त्यांना विरोध करत होती. तिचे नाव मारिया. ही मारिया शिकली अमेरिकेतच. तिचे व्यक्तिमत्त्वही काहीसे अमेरिकी वळणाचे. त्यामुळे अमेरिकेनेच चावेझ यांच्या विरोधात त्यांना चावी दिली आहे, अशी टीका चावेझ यांचे समर्थक तेव्हा करत असत. ते अशक्य नव्हतेही. अमेरिकेला लॅटिन अमेरिकेला नेहमीच धडा शिकवायचा असतो. ट्रम्प यांना तर लॅटिन अमेरिकेचा फार त्रास. आता मारियांना नोबेल मिळाल्याने ते अधोरेखितच झाले!

चावेझ गेल्यानंतर मादुरो नावाचा नवा सत्ताधीश खुर्चीवर बसला. चावेझ यांच्याकडे काही उद्दिष्ट होते. दृष्टी होती. मादुरो ही त्या विचारांची अधोगती होती. हुकूमशहाचे अवगुण त्याच्यामध्ये ठासून भरलेले. मात्र, त्यालाही मारियाला संपवणे शक्य झाले नाही. विरोधकांचा चेहरा म्हणून मारिया पुढे आल्या. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्या उभा ठाकल्या असत्या, मात्र त्यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांचे राजकीय करियर संपवण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरीही, बाई हिम्मत हरल्या नाहीत. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. आहेही. मादुरो हे हुकूमशहा आहेतच, पण ट्रम्प यांनी त्यांना लोकशाही सांगावी, हे फारच झाले. असो.

तर आपण मारियाविषयी बोलतोय.

त्यांना मागे एकदा विचारलं होते- इतकी वर्षे तुम्ही लढत आहात. झुंजत आहात. तरी यश मिळत नाही. तुम्हाला नैराश्य येत नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, “येतं तर. पण, अशावेळी मी महात्मा गांधींकडे बघते. सहा दशके या माणसाने संघर्ष केला, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मात्र, गांधी हिंमत हरले नाहीत. सत्य आणि अहिंसा या मार्गानेच यश मिळते, यावर माझी श्रद्धा आहे.”

आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असोत की अमेरिकेतला बराक ओबामा किंवा लॅटिन अमेरिकेतील ही मारिया. मोहनदास करमचंद गांधी हाच या माणसांचा आदर्श असतो. किमान, त्यांचे नाव तरी घ्यावे लागते! त्यातही गंमत अशी की, खुद्द महात्मा गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नाही. त्यांचे नाव अनेक वेळा चर्चेत आले. नामांकनही मिळाले. प्रत्यक्षात मात्र गांधींना नोबेल कधीच मिळाले नाही. नोबेल समितीलाही त्याचा पश्चाताप होत असतो. गांधींच्या वाटेने चालणाऱ्या, त्यांचे नाव घेणार्‍या अनेकांना नोबेल मिळाले. गांधींवर काढलेल्या सिनेमाला ‘ऑस्कर’ मिळाले. गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नव्हते.

अर्थात, नव्हते मिळाले ते बरेच झाले. जे नोबेल गांधींना मिळाले, त्यावर कोणी डोनाल्ड ट्रम्प हक्क सांगतोय, हे सहन करणेही कठीण गेले असते. एनी वे, मारिया मचाडो यांचे अभिनंदन. त्यांना नोबेल मिळणे हाही अमेरिकेचाच डाव असला तरीही!

 

– संजय आवटे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *