भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष लवकरच जाहीर होणार; रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर लवकरच नवा नेता विराजमान होणार असून, या शर्यतीत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं.

सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडे देशभरात 14 कोटींपेक्षा अधिक सक्रिय सदस्यसंख्या असून, पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषद निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नियुक्ती पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे.भाजपच्या सूत्रांनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यानंतर, पक्षाने रवींद्र चव्हाण यांना जानेवारी 2025 मध्ये प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. आता त्यांची स्थायी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता प्रबळ आहे.

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदारसंघाचे चार वेळा आमदार असून, सध्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.बावनकुळे यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 मध्ये संपत असल्याने पुढील अध्यक्ष कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *