*भुसावळ* – भुसावळ तालुक्यासाठी पूर्णत्वास येत असलेले भुसावळ तालुका क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या क्रीडा संकुलनास लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचे नाव देणे संदर्भात लेवा समाजातर्फे नुकतेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ तालुक्यात 7 कोटी 29 लाख 45 हजार रुपयांच्या निधीतून शहरातील क्रीडा संकुल उभारले जात आहे. स्विमिंग पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता विविध खेळांची मैदाने तयार केली जात आहेत.
कामासाठी दिलेली मुदत जुलै अखेरपर्यंत संपणार आहे. संकुलाचे कामही याच दरम्यान पूर्ण होईल. वेळेत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने नुकतीच दिली आहे भुसावळ तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, इनडोअर गेम्स स्टेडियमच्या इमारतीचेही काम पूर्ण झाले आहे.
सध्या बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, टेनीस, लाँग जंम्प, ट्रिपल जंम्प, रनिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, नेट क्रिकेट आदी मैदानांचे स्वतंत्र मैदाने तयार केली जात आहे.यासाठी जमिन समतीलकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. काम जलदगतीने व गुणवत्तेत पूर्ण करण्यात यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात रंगरंगोटी करुन जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल.
तालुका क्रीडा संकुलातील गॅलरी व इनडोअर गेम्ससाठी हॉलचे कामही पूर्णत्वाकडे गेले आहे. यानंतरच्या टप्प्यात विविध उर्वरित कामांनाही गती दिली जाणार आहे. ही कामे अत्यंत जलद गतीने पूर्ण होतील, अशी माहितीही क्रीडा विभागाने दिली.
शहरातील क्रीडा संकुलात मैदाने तयार करण्याच्या कामाला गती आली. भुसावळ शहरातील हे क्रीडा संकुल संपूर्णपणे तयार झाल्यानंतर ,या क्रीडा संकुलाचे राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा संदेश देणारे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल क्रीडा संकुल भुसावळ तालुका भुसावळ जिल्हा जळगाव असे नामकरण करण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण होणे करिता लेवा पाटीदार समाजातर्फे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रांताधिकारी कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते साहेब यांना देण्यात आले.
याप्रसंगी लेवा हितवादी चळवळीचे मुख्य प्रवर्तक शिशिर जावळे, सकल लेवा सखी मंडळाच्या अध्यक्षा तथा भोरगाव लेवा पंच सौ मंगला पाटील, अमोल पाटील, अँड सागर सरोदे, बापू दादा महाजन,पवन बाकसे, विकास पाटील, राहुल पाटील, दिगंबर भोळे,, शांताबाई भोळे ललित पाटील, दिलीप चौधरी, साई सरोदे, कुशल पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.