पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घाना दौर्यामुळे भारत-घाना संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. तीन दशकांनंतर घानाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. अकरा येथील ‘जुबिली हाऊस’मध्ये मोदी आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमानी महामा यांच्यात द्विपक्षीय उच्चस्तरीय चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांनी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, कृषी, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला.
या दौऱ्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, पारंपरिक वैद्यकशास्त्र, मानकीकरण आणि परराष्ट्र मंत्रालयांमधील संयुक्त आयोग यांसारख्या चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामुळे दोन्ही देशांतील संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. भारताने डिजिटल पेमेंट (UPI), जन औषधि योजनेचा अनुभव, कौशल्यविकास व लसीकरण क्षेत्रातील सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने – “ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा गौरव भारतातील 1.4 अब्ज नागरिकांना, विशेषतः तरुणांच्या आकांक्षांना अर्पण केला आणि असे नमूद केले की हा सन्मान दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्याची जबाबदारी वाढवतो.
संयुक्त निवेदनात मोदींनी ‘फीड घाना’ योजनेचे कौतुक करताना भारताच्या सहकार्याचे आश्वासन दिले. भारत आयटीईसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्तीची संख्या दुप्पट करणार असून, घानात कौशल्यविकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात सायबर सुरक्षा, नौदल प्रशिक्षण आणि सागरी सहकार्य वाढवण्याचे ठरले आहे.

Leave a Reply