भुसावळ येथील चार विद्यार्थ्यांनी इस्कॉन आयोजित मूल्यांकन शिक्षण गीता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे त्यांची थेट ‘इस्रो’ भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिल रोजी बंगळुरू येथील चांद्रयान मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्हा व बुरहानपूर विभागातून घेण्यात आलेल्या या जागतिक गीता स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात वर्ल्ड स्कूल, भुसावळ येथील सातवीचा विद्यार्थी सानिध्य श्रीवास्तव याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याची बहीण शाम्भवी श्रीवास्तव हिनेही आठ ते दहा वयोगटात ९८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
याशिवाय, सेंट अलायसीस शाळेचा पाचवीचा विद्यार्थी कृष्णा चौधरी आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची सातवीची इरा अग्रवाल यांनीही स्पर्धेत उत्तम यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सायकल बक्षिस स्वरूपात मिळणार असून, ‘इस्रो’ भेटीदरम्यान त्यांना वैज्ञानिक सोमनाथ यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
कृष्णा व इरा हे इस्कॉनच्या ‘गोपाल फन स्कूल’चे नियमित विद्यार्थी असून, ही परीक्षा पुणे व भुसावळ येथे एकाच वेळी घेण्यात आली होती.
या स्पर्धेत एकूण ९० विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये पारितोषिके पटकावली, काही विद्यार्थी भुसावळ,जळगाव,रावेर ,जामनेर येथील आहे त्यांचा सन्मान समारंभ १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कमल गणपती हॉल, भुसावळ येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत.
भविष्यात अशा अनेक उपक्रमांची योजना असून, विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण रुजवण्याचे काम सुरू राहील, असे आयोजकांनी सांगितले इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष प्रभु रासयात्रादास यांनी सांगितले

Leave a Reply