पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय क्रीडा महोत्सव देशभर आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाबाबतची आढावा बैठक केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस राज्याचे क्रीडा मंत्री मा. माणिकराव कोकाटे ऑनलाइन मंत्रालयातून सहभागी झाले. बैठकीला विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, विविध राज्यांचे क्रीडा मंत्री, सचिव व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला गती देण्यासाठी क्रीडा क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी या महोत्सवात जिल्हा, विद्यापीठ, महाविद्यालय व स्टेडियम स्तरावर क्रीडा स्पर्धा, वादविवाद, चर्चासत्रे, योग, बुद्धिबळ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यात तज्ज्ञ व क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभागही राहणार असून, ३१ ऑगस्ट रोजी देशभर सायकलिंग उपक्रमाद्वारे या महोत्सवाचा समारोप होईल. महाराष्ट्र राज्य खेळ व खेळाडूंमध्ये नेहमीच अव्वल स्थान राखेल, असा विश्वास क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply