संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून रोज सकाळी पसायदानाचे सामूहिक पठण अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३१ जुलै रोजी सर्व शाळांना आदेश दिले असून, उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाला पत्र पाठवले आहे. अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद व संस्थात्मक शाळांनाही हे पठण बंधनकारक असेल.
गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त झेंडावंदन, प्रभातफेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आधीच अनेक शाळांनी तयारी सुरू केली आहे. काही शाळांनी आदेश मिळताच पसायदानाचे पठण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच संस्कार घडावेत, अध्यात्मिक मूल्ये रुजावीत आणि राष्ट्रभक्तीची भावना वाढावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply