विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचे ‘भोंगा नाद आंदोलन’!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ‘भोंगा नाद आंदोलन’ करण्यात आले. उन्हाळी सत्र परीक्षांतील गोंधळ, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे अचानक वाढवलेले शुल्क आणि विद्यार्थ्यांच्या निकालांमधील त्रुटींविरोधात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आले.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथून असंख्य विद्यार्थी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला शुल्क भरून प्रवेश घेतलेला असताना, वर्ष संपताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सुमारे १००% शुल्क वाढ करण्यात आली आहे. ही कृती पारदर्शकतेच्या तत्त्वाला विरोध करणारी असून, युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचाही भंग करणारी आहे. परीक्षेला उपस्थित असूनही अनेक विद्यार्थ्यांना ‘अनुपस्थित’ दर्शवण्यात आले असून, परिणामी त्यांचे निकाल चुकीचे लागले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तक्रारींसाठी दिलेले हेल्पलाइन क्रमांकही अनेकदा बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत निवारण होत नाहीत.

यासंदर्भात अभाविपच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. अभाविपच्या मागण्या स्पष्ट आणि ठोस असून, त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत. शुल्कवाढ ही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केलेल्या दरानुसारच असावी व अचानक वाढवलेली रक्कम मागे घेण्यात यावी. पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ ही नियमानुसार दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. परीक्षेला उपस्थित असूनही जे विद्यार्थी ‘अनुपस्थित’ दर्शवले गेले आहेत, त्यांचा निकाल त्वरित तपासून दोन दिवसांच्या आत सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा. यासोबतच, निकाल गोंधळास कारणीभूत असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीची मागणी केल्यानंतर ती ठराविक कालमर्यादेत देण्यात यावी आणि पुनर्मूल्यांकनाचा निकालदेखील नियोजित वेळेतच जाहीर करण्यात यावा. सर्व अभ्यासक्रमांकरिता फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाचे शुल्क एकसारखे असावे व हे शुल्क वाजवी असावे. पेपर तपासणी योग्य तज्ज्ञांकडूनच व्हावी, याची विद्यापीठ प्रशासनाने खातरजमा करावी. मूल्यांकन व्यवस्थित पार पडावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा त्वरीत कराव्यात. अश्या मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, कुलसचिवांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलेले असले तरी, ते अनेकदा बंद असतात किंवा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठाने तक्रार निवारणासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत व विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात.अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे म्हणाल्या की, “विद्यापीठाला वारंवार निवेदन देऊनही विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हे सर्व विद्यार्थी ह्या सर्व समस्यांना त्रासून निघालेले आहेत तरी शुल्कवाढ मागे घेतली नाही आणि परीक्षा प्रक्रिया सुधारली नाही तर विद्यापीठात पुन्हा याहून मोठे आंदोलन उभे करण्यात येईल.”

या आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, प्रदेश सहमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जळगाव महानगर मंत्री सागर बारी, जिल्हा संयोजक तेजस पाटील आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. विद्यार्थीहितासाठी अभाविपने केलेले हे आंदोलन विद्यार्थी हिताचे असून विद्यापीठ प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *